पिंपरी-चिंचवडला शिक्षण आणि संशोधन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि JSW प्रोजेक्ट्सने चिंचवडमधील रिसर्च पार्कमध्ये स्वदेशी बॅटरी संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पात ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक प्रस्तावित आहे.
या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट लिथियम-आयन, सोडियम-आयन आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी सेलचे संशोधन, प्रोटोटाइपिंग आणि प्रमाणीकरण करणे हे आहे. या प्रकल्पामुळे या क्षेत्रात संशोधन, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. या भागीदारीतून १,००० रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
हे केंद्र विद्यार्थ्यांना आणि तरुण अभियंत्यांना प्रगत तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल. महेश लांडगे यांनी शहरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, COEP आणि IIM नागपूरसारख्या शैक्षणिक संधी आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत नियोजित आहे.








