चिंचवड | 2 ऑक्टोबर 2026
वाल्हेकरवाडी परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणासह त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे वडील आणि भाऊ जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील एच.पी. पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली.
फिर्यादीतील आरोपानुसार, इरफान याचे एका आरोपीच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या संशयातून अभिषेक लालमण यादव, नागेश व्यंकटराव चोपडे, अशितोष दयानंद शितोळे, अभिषेक लाल गिरगोसावी तसेच इतर व्यक्तींनी इरफानवर हल्ला केल्याचे म्हटले आहे.
हल्लेखोरांनी कोयत्याने इरफानच्या पाठीत मणक्याजवळ, हाताच्या पंजा व अंगठ्याच्या भागात, कोपऱ्यावर तसेच डोक्याच्या डाव्या बाजूला वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला हाताने आणि लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी इरफान पळू लागल्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि हातातील कोयते फिरवत जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे.
इरफानला वाचवण्यासाठी त्याचे वडील इस्माईल गणी शेख आणि भाऊ अहमद पुढे आले असता त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिषेक यादव, नागेश चोपडे, अशितोष शितोळे आणि अभिषेक गिरगोसावी यांना अटक केल्याची माहिती आहे.
या घटनेतील इतर व्यक्तींची भूमिका, हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास चिंचवड पोलिस करत आहेत.









