सांगवी : स्वतःला HDFC बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून कार लोन फोरक्लोज करून देण्याच्या बहाण्याने एका 44 वर्षीय महिलेची ₹2 लाख 22 हजार 474 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार जुनी सांगवी परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीत हा प्रकार घडला. तक्रारीत नाव असलेल्या श्रुतिक सदानंद कासारे (रा. बदलापूर, ठाणे) याने फोनवरून आपण HDFC बँकेच्या बंडगार्डन शाखेतील कर्मचारी असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.

महिलेचे कार लोन फोरक्लोज करून देऊ, असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांवर वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे एकूण ₹2,22,474 घेण्यात आले.

मात्र, पैसे भरल्यानंतरही कार लोन फोरक्लोज झाले नाही. महिलेने पैसे परत मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीशी वारंवार संपर्क साधल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र रक्कम परत न मिळाल्याने अखेर तिने सांगवी पोलिसांकडे तक्रार केली.

महिलेच्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

PCMC24 नागरिक सूचना: बँक कर्ज, फोरक्लोजर किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी आलेल्या फोनवर लगेच विश्वास ठेवू नका. व्यवहार करण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत शाखेशी किंवा अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करून माहितीची खात्री करा.