शहराची वाढती पाणीगरज लक्षात घेऊन महापालिकेने आंद्रा धरणातून थेट पाणी उचलण्याची योजना हाती घेतली आहे. जॅकवेल आणि बंदिस्त जलवाहिनीच्या कामांसाठी आवश्यक २२० कोटी रुपयांच्या खर्चाला अंदाजपत्रक समितीने मंजुरी दिल्याने आता या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
सध्या आंद्रा योजनेतील जॅकवेल पूर्ण न झाल्याने निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून दररोज सुमारे ९५ एमएलडी अशुद्ध पाणी तात्पुरत्या स्वरूपात उचलले जाते. चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून हे पाणी शहराला पुरवले जाते.
आंद्रा धरणातून थेट पाणी उचलण्यासाठी आवश्यक जागा जलसंपदा विभागाकडून मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी भामा-आसखेड धरणातून अतिरिक्त पाणी आणण्याचे कामही महापालिकेच्या नियोजनात आहे.





