मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून कार धडकल्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील फूड मॉलच्या विरुद्ध बाजूस, पुणे-मुंबई मार्गिकेवर २६ सप्टेंबरला सकाळी सुमारे ९.२५ वाजता हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण कामावर जाण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने कारने निघाला होता. त्या वेळी मार्गावर एक टँकर धोकादायक स्थितीत उभा होता. कार पाठीमागून टँकरवर जोरात आदळल्याने तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारचेही मोठे नुकसान झाले.

द्रुतगती मार्गावर वाहने उभी करण्यास बंदी असतानाही चालकाने पार्किंग दिवे किंवा धोक्याचे कोणतेही संकेत न लावता टँकर उभा केला होता, असा आरोप फिर्यादीत आहे. मृत तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून टँकरचालकाविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.