फिर्यादीनुसार, २७ वर्षीय तक्रारदार आणि त्याचा मित्र विशाल चौगुले मोटारसायकलवरून कामावरून घरी जात होते. वडमुखवाडीतील सेल पेट्रोल पंपासमोर मागून आलेल्या हायवा टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. विशाल चौगुले यांच्या डोक्याला, उजव्या हाताला आणि पायाला मार लागला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलचेही नुकसान झाले.

हायवा चालक भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. भोसरीतील मोहननगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय चालकाविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास पोलिस करत आहेत.