महाळुंगे | 3 ऑक्टोबर 2026
निगडी परिसरात रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून 11 हजार 470 रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चिंतामण देसलेपाटील (वय 21) हे 28 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास निगडी-तळवडे ब्रिज रोडवरून जात होते.
त्यावेळी एका रिक्षाचालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर दमदाटी करून त्यांच्या पँट आणि शर्टच्या खिशातील 11 हजार 470 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली. सुरुवातीला ठोस माहिती उपलब्ध नसतानाही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.
सीसीटीव्ही तपासातून संशयित रिक्षाचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान अमन ऊर्फ शहाबाज समीर शेख (वय 26) आणि शेखर बापू माने (वय 31) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमन ऊर्फ शहाबाज समीर शेख हा निगडी पोलिस ठाण्यातील मोक्का प्रकरणातून काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेखर माने याच्याविरुद्धही जबरी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करीत आहेत.
















