मोशी प्राधिकरणातील सेक्टर-४ मध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ करत होते.

पथकाने दहा दिवस परिसरातील सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले. त्यानंतर खबऱ्याकडून संशयित मोशीतील आदर्शनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली आणि संघर्ष कॉलनी येथे कारवाई करून तिघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत संशयितांनी मंगळसूत्र हिसकावल्याची, तसेच पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथून एक दुचाकी चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळसूत्र आणि दुचाकी पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

ताब्यात घेतलेले संशयित रेकॉर्डवरील असून त्यांच्याविरोधात दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.