चिंचवड येथील हॉटेल सरपंच माळा, शेलारवस्ती येथे जेवणावरून झालेल्या वादानंतर एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आदित्य भगवान कळमकर (वय २८) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.४५ ते ११.३५ च्या सुमारास आदित्य कळमकर हे त्यांचे मित्र निलेश कांबळे यांच्यासोबत हॉटेल सरपंच माळा येथे जेवण करत होते. त्यावेळी जेवणावरून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. चार अज्ञात व्यक्तींनी कळमकर यांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका आरोपीने बिअरची बाटली कळमकर यांच्या डोक्यात फोडल्याचेही सांगण्यात आले आहे, तर इतर आरोपींनी दगडफेक केली.
या मारहाणीत आदित्य कळमकर यांच्या डोक्याला, डाव्या खांद्याला, डाव्या पायाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कळमकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.


















