पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) भूखंडांवर अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरसेवक तुषार सहानी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सहानी यांच्या म्हणण्यानुसार, मोशीतील सेक्टर ९, ११ आणि १३ मधील पीएमआरडीएच्या मोकळ्या भूखंडांवर अवजड वाहने, विशेषतः कंटेनर, अनधिकृतपणे उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्पाइन रोडवरील जय गणेश साम्राज्य चौक ते संत नगर चौक आणि स्पाइन मॉल चौक ते सेक्टर १३ ब्रिजपर्यंत दुतर्फा वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात, ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी वाढते आणि अपघातांचा धोका निर्माण होतो.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक तुषार सहानी यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन दिले होते. उपमुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदनाची दखल घेऊन पीएमआरडीएला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सहानी यांनी तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे यांनाही निवेदन दिले होते. यानंतर पोलीस प्रशासनाने स्पाइन रोड आणि मोशी परिसरात अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये 'नो पार्किंग' आणि 'विषम-सम पार्किंग' फलक लावणे, दंड आकारणे, वाहने टोईंग करणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डन नियुक्त करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय, सहानी यांनी पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) चा परिसर दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत स्थानिक नागरिकांसाठी, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, जॉगिंग आणि चालण्यासाठी खुला करण्याची मागणी केली आहे. या मागणीवरही उपमुख्यमंत्री कार्यालयाने पीएमआरडीएला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.











