पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी-चऱ्होली-चिखली परिसरात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागेची निवड करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
या प्रस्तावित सांस्कृतिक केंद्राला 'नाना पाटेकर नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्र' असे नाव देण्यात येणार आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक ओळख अधिक मजबूत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, नाना पाटेकर यांच्या मराठी आणि हिंदी चित्रपट, नाट्य क्षेत्रातील तसेच सामाजिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हा देखील यामागील हेतू आहे.
या नाट्यगृहात पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचप्रमाणे मोठी आसनक्षमता असेल. यामध्ये प्रशस्त रंगमंच, उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, कलाकारांसाठी स्वतंत्र खोल्या, सराव कक्ष, लहान कार्यक्रमांसाठी सभागृह, दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ प्रवेश आणि आवश्यक सुरक्षा सुविधांचा समावेश असेल. जागेची निवड करताना पार्किंग, सार्वजनिक वाहतूक आणि वाहतूक व्यवस्थापनाचा विचार करण्याची मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
या प्रकल्पाला सर्वसाधारण सभेने एकमताने ठराव मंजूर करावा, असेही लांडगे यांनी सुचवले आहे. जागेची निश्चिती करण्यासाठी आणि प्रकल्प अहवालाचे काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची आणि प्रगती अहवाल लेखी स्वरूपात देण्याची विनंती त्यांनी केली आहे. या केंद्राद्वारे परिसरातील रहिवासी, कलाकार, नाट्यसंस्था, शाळा आणि महाविद्यालयांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होईल, असे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.










