पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व निर्धारण विभागाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कै. महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी या संदर्भात सूचना दिल्या. मालमत्ता कर महसूल हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून, त्यातून विविध विकासकामे आणि नागरी सुविधा पुरवल्या जातात.
या बैठकीत थकबाकी मालमत्ता कर, मालमत्ता जप्तीची कारवाई, मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे, सारथी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी आणि मागील बैठकीतील सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. कर वसुलीत विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपल्या क्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि त्याबाबतची लेखी माहिती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले.
मागील पाच वर्षांतील मालमत्ता कर वसुलीच्या आकडेवारीची तुलना करून या वर्षी वसुलीत वाढ अपेक्षित आहे. थकबाकीदारांना त्यांच्या थकबाकीबद्दल वारंवार माहिती दिली जाईल आणि सूचना देऊनही कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल. नवीन मालमत्ता सर्वेक्षणातील मालमत्तांना प्राधान्य देऊन निवासी, बिगरनिवासी, मिश्र वापर, औद्योगिक आणि मोकळ्या जागांच्या मालमत्तांची माहिती अद्ययावत करण्यावर भर दिला जाईल. तसेच, प्रलंबित मालमत्ता कर संबंधित तक्रारींचे निराकरण करणे आणि मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी स्वतः संपूर्ण कर वसुली प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कर वसुलीच्या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन प्रगती तपासली जाईल.
या बैठकीला सचिन पवार, रश्मी देशपांडे, बाळू लोंढे, हनुमंत सरवदे, मनोज शिंदे, अजित नखाते, रणजित भोसले, जयंत मारळीकर, राजेश बांदल, रवींद्र शिंदे, राजेंद्र कुदळे, प्रसाद एच. एस., राकेश सौदे, अतुल काळे, नाना सोनटके, खुकाळे एस., नीता राणे, डी. डी. गोरडे, हनुमंत मोरे, मिलिंद कांबळे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.











