चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये मंगळवारी (२९ सप्टेंबर) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात परिसरातील उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती आमदार उमा खापरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाचवी उत्तीर्णांपासून दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आणि इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार संधी मिळेल. बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, बजाज, ह्युंदाई आदी कंपन्या सहभागी होणार असल्याचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले. तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी "जॉब कार्ड" उपक्रम राबवला जाणार आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत बायोडाटा घेऊन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याच ठिकाणी दुपारी २ वाजता भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचा राज्यस्तरीय महामेळावा होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल, अशी माहिती युनियनचे संस्थापक अध्यक्ष अनुप मोरे यांनी दिली. या मेळाव्यात १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार असून सन २०३० पर्यंत राज्यात ३० हजार पदाधिकारी जोडण्याचा संकल्प केला जाणार आहे.
कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित विषयांवर या मेळाव्यात मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.










