गेल्या अडीच वर्षांपासून या मशिन्समध्ये तांत्रिक बिघाड, सर्व्हरच्या अडचणी आणि डेटा हस्तांतरणातील अडथळे येत असल्याचा दावा डॉ. विजयकुमार पाटील यांनी केला आहे. मशिन्स बंद असताना हजेरीसाठी पुन्हा हाताने लिहिलेल्या रजिस्टरचा आधार घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांना लेट मार्क किंवा गैरहजेरीचा फटका बसू शकतो, तसेच कंत्राटी कामगारांच्या संख्येत कागदोपत्री फेरफार होण्याचा धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
करारानुसार मशिन्सची देखभाल कंत्राटदाराकडे असून मशिन २४ ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र बिघाडानंतर तंत्रज्ञ वेळेत येत नाहीत आणि दंडाची कारवाईही होत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रकल्पाचा खर्च, निविदा प्रक्रिया, मशिन्सची गुणवत्ता, सर्व्हर व्यवस्था आणि कंत्राटदाराच्या कामगिरीचे स्वतंत्र ऑडिट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. याबाबत महापालिकेची बाजू अद्याप समोर आलेली नाही.










