जय भवानी मित्र मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात लहान मुले आणि महिलांच्या कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम घेते. रोजच्या धावपळीतून काही आनंदाचे क्षण मिळावेत, हा त्यामागचा उद्देश असल्याचे मंडळाने सांगितले.
यंदा मंडळाने महिलांसाठी लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा आयोजित केली. हास्यविनोद आणि मनोरंजक प्रश्नांनी स्पर्धेची सुरुवात झाली. योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना बक्षिसे देण्यात आली, तर महिलांनी घेतलेल्या उखाण्यांनी स्पर्धेत रंगत आणली.
विविध खेळांच्या फेऱ्यांमध्ये स्पर्धक महिलांनी उत्साहाने भाग घेतला. स्पर्धा जसजशी पुढे सरकत होती, तसतशी चुरस आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढत गेली.
मंडळाचे अध्यक्ष संजय जराड यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे नियोजन केले.







