नढे यांच्या तक्रारीनुसार, जनसंपर्क विभागातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे काम एका खासगी संस्थेला एका वर्षासाठी देण्यात आले होते. ती मुदत संपल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी ३ मार्च २०२१ रोजी नवी निविदा काढण्याचे आणि मुदतवाढ न देण्याचे निर्देश दिले होते.

मात्र नवी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही आणि जुन्याच संस्थेकडून काम सुरू ठेवण्यात आले, असा आरोप नढे यांनी केला आहे. २०२१ मध्ये दोन संस्थांनी सुरक्षा ठेवीबाबत असमर्थता दर्शवल्यानंतरही निविदा प्रक्रिया तातडीने मार्गी लावली गेली नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे.

याच प्रकरणाशी संबंधित सुमारे २२ कोटी रुपयांच्या निविदेबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षण विभागाने २ सप्टेंबर २०२४ रोजी २० आक्षेप नोंदवले होते, याकडे नढे यांनी लक्ष वेधले आहे.

निविदेतील निर्णय, कामाचा कालावधी, खर्च आणि लेखापरीक्षणातील आक्षेपांची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी त्यांची मागणी आहे. या आरोपांवर महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही.