पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) निगडी येथील कै. इंदिरा गांधी उद्यानातील अप्पू घर प्रकल्प पुष्पक अम्यूजमेंटला १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला आहे. स्थानिक भाजप नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता हा निर्णय घेण्यात आला होता. आता या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पालिकेने लेखी उत्तरात दिली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अप्पू घरमधील प्रस्तावित राइड्स आणि मनोरंजनाच्या सुविधांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत की नाही, याची माहिती पालिकेकडे नाही. तसेच, राइड्सची सुरक्षा तपासणी, विद्युत सुरक्षा आणि इतर आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रांची पूर्तता झाली आहे की नाही, याबाबतही पालिकेला माहिती नाही. प्रकल्पाच्या कामाची प्रस्तावित सुरुवात आणि पूर्ण होण्याची तारीख, तसेच सध्याच्या कामाची प्रगती याबद्दलही पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. प्रवेश शुल्क आणि राइड्सच्या शुल्काबाबत कोणतेही धोरण निश्चित करण्यात आलेले नाही.
सुरक्षा उपाययोजनांबाबतही पालिकेकडे माहितीचा अभाव आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन सेवा, अग्निसुरक्षा किंवा आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग यासारख्या सुरक्षा उपायांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याव्यतिरिक्त, इंदिरा गांधी पार्क आणि दुर्गादेवी टेकडी परिसरावर या प्रकल्पाचे पर्यावरण, वाहतूक आणि स्थानिक रहिवाशांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर कोणताही अभ्यास किंवा अहवाल तयार करण्यात आलेला नाही.
पुष्पक अम्यूजमेंटकडे पालिकेचे ६,८३,६६५ रुपये येणे बाकी आहेत. कंत्राटदाराने २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये पाणीटंचाईचे कारण देत, तसेच मार्च २०२० ते डिसेंबर २०२२ या कालावधीत कोविड-१९ महामारीमुळे अप्पू घर आणि वॉटर पार्क बंद राहिल्याने तीन वर्षांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, सत्ताधारी भाजपने त्यांना १५ वर्षांची मुदतवाढ दिली, असेही पालिकेने दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.













