महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता खासगी जागेत जाहिरात फलक उभारणे नियमबाह्य असल्याचे परवाना विभागाने स्पष्ट केले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४४ व २४५ आणि २०२२ च्या आकाशचिन्ह व जाहिरात नियमन नियमांनुसार अशा फलकांसाठी परवानगी बंधनकारक आहे.
शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांमुळे विद्रुपीकरण होत असल्याने महापालिकेने त्यांच्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ताथवडे, थरमॅक्स चौक, समर्थ सहकारी बँकेची इमारत आणि चोवीसावाडी परिसरातील फलक याआधी हटवण्यात आले आहेत.
पुनावळेतील हा फलक विष्णूदेव नगर परिसरात लोखंडी संरचनेसह उभारण्यात आला होता. परवाना विभागाच्या पथकाने तो पूर्णपणे निष्कासित केला.
यापुढे अनधिकृत फलक उभारल्यास ते तात्काळ हटवले जातील, असा इशारा महापालिकेने जाहिरात एजन्सींना दिला आहे.





