थेरगावमधील वनदेव आनंदवन मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव सामाजिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. स्थायी समिती सभापती आणि मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीला पूर्ण फाटा देण्यात आला. संपूर्ण मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
माता जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ यांच्या विवाह सोहळ्याचा जिवंत पौराणिक देखावा हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. हा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी परिसरातील १५ ते २० हजार नागरिक जमले होते. अभिनेत्री उर्मिला कानेटकर, पूर्णिमा डे, स्नेहलता माघाडे आणि नृत्यांगना प्रियांका जाधव यांनीही उत्सवाला हजेरी लावली.
गणेशोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंडळाने "आरोग्याचा श्रीगणेशा" हा आरोग्य तपासणी उपक्रम राबवला. त्यात ओपीडी तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, औषधोपचार, असंसर्गजन्य आजारांची तपासणी तसेच आभा कार्ड आणि आयुष्मान कार्डविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेकडो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. लहान मुलांसाठी बालजत्राही भरवण्यात आली.
प्रशासनाच्या सहकार्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती आणि विशेष जलकुंडांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. "तरुणांनी आणि मंडळांनी डीजे संस्कृतीतून बाहेर पडून परंपरा आणि समाजहिताच्या कामाकडे वळणे गरजेचे आहे," असे अभिषेक बारणे यांनी सांगितले.






