वाकड येथील कोस्टा रिका को-ऑपरेटिव्ह सोसायटीने पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सोसायटीमध्ये वैज्ञानिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनावर या उपक्रमाद्वारे लक्ष केंद्रित केले जाईल.
मदर्स कंपनीच्या सीएसआर अंतर्गत ‘सॉर्ट’ कार्यक्रमाद्वारे या उपक्रमाला पाठिंबा मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एरो बिन, स्टँड्स, कोकोपीट आणि इतर आवश्यक साहित्य पुरवले जाईल. कचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरण, प्रक्रिया, देखभाल आणि उत्पादन व्यवस्थापनावर तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
या प्रकल्पासाठी रोहित सावंत, प्रवीण छेत्री, गौरव सूर्यवंशी, दिगंबर बोडके, प्रसाद आने, सोनाली टेंबे, गिरीश शिंदे, सुदीप कर गुप्ता, राजू शर्मा, समीर पावट आणि निलेश घिनमिने यांचा समावेश असलेली अकरा सदस्यीय ‘झिरो वेस्ट कमिटी’ स्थापन करण्यात आली आहे. रहिवाशांमध्ये जनजागृती करणे, कचरा वर्गीकरणाची माहिती देणे, पत्रके वाटणे आणि कचरा व्यवस्थापनाच्या टप्प्यांवर लक्ष ठेवणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असेल.
सध्या हा प्रकल्प ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर देत आहे. भविष्यात बायो-वेस्ट, प्लास्टिक, इतर पुनर्वापरयोग्य कचरा आणि ई-कचरा यांचे पुनर्वापर करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून त्यांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्याची योजना आहे. गणेश चतुर्थीच्या काळात या उपक्रमाची सुरुवात झाली.











