विविध शासकीय योजना आणि महापालिकेच्या कल्याणकारी सेवांसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यासाठी वाकडमध्ये मंगळवारी (२९ सप्टेंबर) विशेष लाभार्थी शिबिर होणार आहे. ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ८.३० वाजता हा कार्यक्रम होईल.

कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने मागील तीन महिन्यांत घेतलेल्या ‘जनकल्याण शिबिरां’मध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना या वेळी प्रमाणपत्रे दिली जातील. आतापर्यंत ६४ हून अधिक शिबिरे झाली असून ८,५०० हून अधिक नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांनी मोफत एनसीएमसी कार्डसाठीही नोंदणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप होईल. शिबिरांच्या कामाची माहिती देणारा डॅशबोर्डही या वेळी खुला केला जाणार आहे.

शासकीय योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश असून पुढील काळात शिबिरांची व्याप्ती वाढवली जाईल, असे कलाटे यांनी सांगितले.