बहिणीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपी सुबोजित बासू याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुमारे १६ वर्षांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांचा तपास आणि न्यायालयीन पाठपुरावा निर्णायक ठरला.
शिंदेनगर येथील अपराजिता सोसायटीत १४ एप्रिल २०१० रोजी पहाटे ही घटना घडली होती. व्यवसायातील नुकसानीमुळे निराश झालेल्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला २३ वर्षीय बहिणीने विरोध केल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. टी. पवार यांनी पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल केले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार हे प्रकरण "स्टार केस" म्हणून निवडण्यात आले आणि त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे देण्यात आली. सरकारी अभियोक्ता लिना पाठक यांनी सरकारची बाजू मांडली.
पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.







