फाउंडेशनच्या निवेदनानुसार, शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या मोठी असली तरी महापालिकेकडे रीतसर नोंदणी केलेल्यांची संख्या अत्यल्प आहे. अनेक कुत्र्यांचे लसीकरण आणि निगा योग्य प्रकारे होत नसल्याने रेबीजचा धोका वाढतो, असे म्हटले आहे.

झोपडपट्ट्या, चाळी, पुनर्वसन इमारती, तसेच रस्त्यालगतची दुकाने, गॅरेज आणि हॉटेलांच्या परिसरात कुत्र्यांना मोकळे सोडले जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दुचाकीस्वारांना धोका निर्माण होत असून कुत्र्यांच्या झुंडींमुळे अपघातही होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

कुत्रे पाळण्याबाबतचे नियम कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी, असे फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश जगताप यांनी म्हटले आहे. कठोर कारवाई झाल्याशिवाय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार नाही, असे ते म्हणाले.

महापालिकेने याबाबत पावले न उचलल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पाळीव कुत्र्यांसाठी महापालिकेचा परवाना घेणे आणि नियमित लसीकरण करणे बंधनकारक आहे.