गणेश विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक पवनेश्वर मंदिराच्या दिशेने जात होती. इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर पोहोचताच गणपतीच्या ट्रॉलीवरील मागच्या बाजूची सजावट अचानक हलू लागली.
सजावट कोसळण्याची शक्यता लक्षात येताच तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी मागून येणारी वाहने तत्काळ थांबवली आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांना सुरक्षित अंतरावर हलवले.
नागरिकांना बाजूला केल्यानंतर काही क्षणांतच सजावटीचा मागचा भाग रस्त्यावर कोसळला. त्यामुळे संभाव्य जीवितहानी आणि वाहनांचे नुकसान टळले. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील साहित्य बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
ट्रॉलीवरील सजावटीचे काम एका खासगी डेकोरेशन व्यावसायिकाने केले होते, अशी माहिती मिळाली. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला.














