दिघी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून घरातून चोरीला गेल्याचे सांगितलेले सोन्या-चांदीचे दागिने फिर्यादीच्या पत्नीनेच घरात लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

पथकाने घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. मात्र इमारतीत बाहेरील व्यक्ती आल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांकडे चौकशी करून पथकाने फिर्यादीच्या पत्नीकडे सखोल विचारपूस केली.

पती सोन्या-चांदीचे दागिने विकून नवीन घर घेणार असल्याने ते विकले जाऊ नयेत म्हणून आपणच ते घरात लपवले, असे तिने चौकशीत सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष लपवलेले दागिने काढून देण्यात आले आणि पोलिसांनी ते जप्त केले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि पथकाने केली. पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.