अनुसूचित जातीच्या (एससी) आरक्षणात उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित घटकांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी, या मागणीसाठी २९ सप्टेंबरला मुंबईत "निर्धार मोर्चा" काढण्यात येणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आझाद मैदानावर होणार आहे.
या मागणीसाठी राज्यभरात आतापर्यंत ७५ हून अधिक मोर्चे आणि आंदोलने झाल्याचे आयोजकांनी सांगितले. "आरक्षणाचा मूळ उद्देश सर्वांचा सर्वांगीण विकास आहे. मात्र अनुसूचित जातीतील काही घटकांना अद्याप अपेक्षित लाभ मिळालेला नाही, त्यामुळे उपवर्गीकरण गरजेचे आहे," असे आमदार गोरखे म्हणाले.
उपवर्गीकरण लागू करून वंचित समाजघटकांना हक्काचा वाटा मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी मिळावी, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे आणि आरक्षणाचा लाभ सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशा मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत.
मोर्चात राज्यभरातून मातंग, मादिगा, बुरूड, चर्मकार यांसह विविध समाजघटक, सामाजिक संघटना, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला आहे.







