प्रतिकूल हवामानातही राज्याच्या विविध भागांतून आलेले समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातींमधील अधिक वंचित घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालात राज्यांना अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
उपवर्गीकरण तातडीने लागू करणे, वंचित घटकांना समान न्याय देणे आणि याबाबत शासनाने ठोस निर्णय घेणे, या प्रमुख मागण्या मोर्चातून शासनासमोर ठेवण्यात आल्या.
२५ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने निर्णय जाहीर न केल्यास २९ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर ‘निर्धार मोर्चा’ आयोजित केला जाईल, असे आयोजकांनी जाहीर केले. या मोर्चात राज्यभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.










