नेपाळ-चीन सीमेजवळील भागात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे या मार्गावर गेलेल्या यात्रेकरूंच्या सुरक्षिततेबद्दल राज्यभर चिंता व्यक्त होत होती. अशा वेळी रावेतमधील पाटील आणि बहिरट कुटुंबांना दोन्ही बहिणी सुखरूप असल्याची बातमी मिळाली आणि त्या घरी परतल्यावर परिसरात आनंदाचे वातावरण होते.
माहेरी आगमन झाल्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. दोघींच्या ओटीभरणाचा आणि पादपूजनाचा कार्यक्रमही झाला. भावजय रुपाली पाटील यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
या वेळी दोन्ही बहिणींनी यात्रेतील अनुभव सांगितले. प्रतिकूल हवामान, कठीण रस्ते, डोंगररांगा आणि ऑक्सिजनचे कमी प्रमाण असलेल्या वातावरणात दृढ इच्छाशक्ती आणि श्रद्धेच्या बळावरच हा प्रवास पूर्ण करता आला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आनंदाच्या या प्रसंगी कुटुंबीयांनी सामाजिक भानही जपले. नेपाळमधील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांना उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.









