सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने ९ ते २६ सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर बंदी घातली होती. याबाबत मंडळांचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन लेखी सूचनाही देण्यात आल्या होत्या.

सातव्या दिवशी सांगवी हद्दीतील ९० मंडळांपैकी काही मंडळांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पाच डीजे मिक्सर, तीन कन्सोल, एक लाईट कंट्रोल मशीन, तीन लॅपटॉप, स्पीकर आणि एक डीजे सेट जप्त करण्यात आला. जप्त साहित्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीचाही समावेश आहे.

संबंधित मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजे मालक आणि चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

पुढील विसर्जन मिरवणुकांतही उच्च क्षमतेची ध्वनियंत्रणा वापरल्यास पूर्वसूचना न देता कठोर कारवाई करून साहित्य जप्त केले जाईल आणि त्याची जबाबदारी मंडळांचे पदाधिकारी व आयोजकांवर राहील, असा इशारा पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिला.