विजय कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सेवा बजावत होते. दोन दिवसांपूर्वी ते कौटुंबिक कारणातून घरातून निघून गेले होते. जाताना त्यांनी आपले शासकीय शस्त्र सोबत नेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला.

त्यांचे शेवटचे मोबाइल लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात मिळाले होते. त्यामुळे या भागात ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली; मात्र दोन दिवस त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

शनिवारी सकाळी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल.

सहकाऱ्याच्या अशा मृत्यूमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

मानसिक ताण किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास राष्ट्रीय टेली-मानस हेल्पलाइनवर १४४१६ (किंवा १-८००-८९१-४४१६) या क्रमांकावर मोफत आणि गोपनीय मदत उपलब्ध आहे.