पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात शस्त्रे आणि धारदार हत्यारे बाळगण्यास मनाई आहे. असे असतानाही २० आणि २१ वर्षांच्या दोघांकडे लोखंडी कोयता आढळल्याने निगडी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

संशयितांच्या ताब्यातील रिक्षात लोखंडी चॅनलला वेल्डिंग केलेल्या फ्रेमचा भंगार माल सापडला. या मालाबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, त्यामुळे तो चोरीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

संशयितांपैकी एकाकडे रिक्षा चालवण्याचा परवाना नसतानाही त्याने रिक्षा भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिस शिपायाच्या फिर्यादीवरून निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक पुढील तपास करत आहेत.