तक्रारीनुसार, सांगलीचा रहिवासी असलेला संशयित मोशी ते चाकण आणि चाकण चौक ते शिक्रापूर मार्गावर थार वाहन निष्काळजीपणे चालवत होता. या दरम्यान त्याने काही वाहनांना धडक देऊन त्यांचे नुकसान केले आणि एका २० वर्षीय तरुणाच्या तोंडाला किरकोळ दुखापत झाली.
वाहन थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तक्रारदार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर त्याने गाडी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. कर्मचारी बाजूला झाल्यानंतर त्याने सरकारी वाहनाला धडक दिली आणि पुन्हा वाहन वळवून कर्मचाऱ्यांच्या दिशेने वेगाने नेले, असे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेत तक्रारदाराच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून सरकारी वाहनाचे नुकसान झाले आहे.
चाकण दक्षिण पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. न्यायालयात सिद्ध होईपर्यंत हे आरोपच आहेत.







