महापालिका हद्दीत अनेक कचरा वाहतूक वाहने आवश्यक परवाना नसतानाही रस्त्यावर धावत असल्याचा आरोप नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी निवेदनात केला आहे.
निगडी परिसरात अलीकडेच झालेल्या अपघाताचा संदर्भ देत अशा वाहनांकडे दुर्लक्ष करणे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परवाना रद्द झालेली किंवा वैध परवाना नसलेली वाहने तात्काळ जप्त करून त्यांच्यावर बंदी घालावी, तसेच संबंधित वाहनमालक, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
शहरातील सर्व कचरा वाहतूक वाहनांच्या परवान्यांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि बेकायदा वाहनांची यादी सार्वजनिक करावी, असेही तरस यांनी सुचवले आहे. या मागणीवर महापालिकेकडून काय कार्यवाही होते, याकडे लक्ष आहे.










