१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तरी हैदराबाद संस्थानातील जनता आणखी तेरा महिने निजामाच्या राजवटीखाली होती. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान स्मरणात राहावे, यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजपत्राद्वारे घेतला आहे.
शहरात विविध राष्ट्रीय दिन, महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त महापालिका स्तरावर कार्यक्रम होतात. मात्र १७ सप्टेंबरसाठी हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्यान, इतिहास प्रदर्शन किंवा विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम का घेतले जात नाहीत, असा प्रश्न अरुण पवार यांनी उपस्थित केला आहे.
हा दिवस केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित नसून देशाच्या एकात्मतेच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे. त्यामुळे तो कोणत्याही राजकीय चौकटीत न पाहता इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस म्हणून साजरा व्हावा, असे पवार यांनी म्हटले आहे.
शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने, निबंध स्पर्धा, इतिहास प्रदर्शन, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि जनजागृती कार्यक्रम घेतल्यास नव्या पिढीला या संघर्षाची माहिती मिळेल, अशी सूचना त्यांनी महापालिकेला केली आहे. याबाबत महापालिकेची प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध नाही.










