मैफलीची सुरुवात ‘आले रे गणपती आज दारी रे’ या गणेशस्तवनाने झाली. त्यानंतर यमन, भूप, बिहाग, काफी आणि भीमपलास या रागांतील बंदिशींचे सादरीकरण झाले. पुढे सुगम संगीत आणि चित्रपट गीतांनी मैफलीची रंगत वाढवली.
महापालिकेच्या विधी समितीच्या सदस्या आणि प्रभागातील नगरसेविका डॉ. कुंदा भिसे यांनी संत तुकाराम महाराजांची ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना सादर केली. उपस्थितांनी त्यांच्या गायनाला दाद दिली.
मैफलीत अकरा बालकलावंतांसह ज्येष्ठ महिला शिष्यांनी विविध गीते सादर केली. तबल्यावर चैतन्य डांगे, तर संवादिनीवर भारती न्यायाधीश यांनी साथ केली. भामिनी महाले यांनी निवेदन केले.
समारोपाला भारती न्यायाधीश यांनी ‘वंदे मातरम्’ सादर केले. उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. कुंदा भिसे, पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे आणि उद्योजक धनंजय भिसे यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.














