परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बस महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन करतात का, हे तपासण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांनी तपासणी केली.
तपासणीत अग्निशामक यंत्र नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे, योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेली असणे, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) नसणे, परवाना किंवा चालक परवाना नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, प्रवासी बसमधून मालवाहतूक करणे आणि वाहनात बेकायदा बदल करणे असे विविध नियमभंग आढळले.
मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांनुसार ६६ बसवर कारवाई करण्यात आली. एकूण १३.७४ लाख रुपयांच्या दंडापैकी सुमारे १०.५७ लाख रुपये वसूल झाले आहेत.
लक्झरी बसच्या चालक-मालकांनी कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, वैध परवाना आणि योग्यता प्रमाणपत्र बाळगावे आणि प्रवासी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन आरटीओने केले आहे. नियमभंग आढळल्यास पुढेही कारवाई सुरू राहील, असे कार्यालयाने स्पष्ट केले.









