संभाजी महाराजांचे शौर्य, विद्वत्ता, प्रशासन, साहित्यनिर्मिती, बलिदान आणि स्वराज्यरक्षणातील योगदान याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय वयातच मिळावी, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यने म्हटले आहे.

प्रतिष्ठानने बालभारतीला दिलेल्या निवेदनात इयत्ता पाचवी किंवा त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्याची मागणी केली आहे. हा अभ्यासक्रम ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित असावा आणि विषय सोपा करण्यासाठी त्यात चित्रे, कालरेषा व पूरक माहिती असावी, असेही सुचवण्यात आले आहे.

याच विषयावर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज जाधव आणि प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व तावरे यांनी या मागणीसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. बालभारतीकडून या निवेदनावर काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष आहे.