पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन, आकुर्डी येथे नुकताच आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. या समारंभात ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. वास्तुशास्त्र हे केवळ बांधकाम नाही, तर ते संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि भावनांचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
दोशी यांनी आपल्या चार दशकांच्या वास्तुविशारद क्षेत्रातील प्रवासाचे अनुभव कथन केले. त्यांनी आपल्या कामाची दुर्मिळ छायाचित्रेही विद्यार्थ्यांना दाखवली. अपयशाला घाबरू नका, तर श्रद्धा, संयम आणि सरावाने यश व आनंद मिळवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. इमारतीचे बांधकाम करताना जागा, सूर्यप्रकाश, बाग आणि डिझाइन यांसारख्या गोष्टींचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भर दिला. फेरो-सिमेंटने आर्किटेक्चरच्या क्षेत्रात विविधता आणली असल्याचेही दोशी यांनी नमूद केले.
यावेळी वास्तुविशारद गौरव भंगारे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी किमान तीन वर्षे अनुभवी वास्तुविशारदासोबत काम करावे. या कार्यक्रमाला डॉ. स्मिता सूर्यवंशी, अजय हरळे, रुजुता पाठक, लक्ष्मण तोरगळे, किसन काळे, प्रा. शिवा शिशोविया, प्रा. दक्षा देशमुख, ज्ञानेश्वर लांडगे, पद्माताई भोसले, विठ्ठल कळभोर, शांताराम गरडे, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य कळभोर, डॉ. गिरीश देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.












