तक्रारदार आणि संशयित हे दोघे पेंट शॉपमध्ये एकत्र काम करतात. तक्रारीनुसार, संशयित १९ वर्षीय सहकारी तक्रारदाराच्या कामातील वाहनावर लावलेली सिल्व्हर खूण (टिकली) खोडसाळपणे काढत होता. त्यामुळे वाहनाचे पेंट कव्हरेज योग्य होत नव्हते.
ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वरिष्ठ लाईनमनकडे तक्रार केली. त्यानंतर संशयिताने हातात लोखंडी पाइप घेऊन येत तक्रार का केली, अशी विचारणा करत तक्रारदाराच्या डाव्या डोळ्याच्या वर मारहाण केली, असा आरोप आहे.
त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत तक्रारदार जखमी झाला.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. कंपनीकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.











