शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मॉल आणि बसस्थानकांसारख्या सार्वजनिक व संस्थात्मक आवारांतून पकडलेल्या भटक्या कुत्र्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात पाच निवारा केंद्रे (डॉग शेल्टर) उभारणार आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
तळवडे, पुनावळे, चिंचवडमधील मोहननगर, तसेच भोसरीतील शाहूनगर आणि सद्गुरुनगर येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर ही केंद्रे उभारण्याचे सुचविण्यात आले आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी भूमी व जिंदगी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रात सुमारे एक हजार कुत्र्यांना ठेवण्याची क्षमता असेल, तसेच आक्रमक किंवा धोकादायक ठरू शकणाऱ्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.
सार्वजनिक आवारांतून पकडलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करून त्यांना नियोजित निवारा केंद्रात हलवावे आणि पुन्हा त्याच ठिकाणी सोडू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ही तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सध्या महापालिकेचे पिंपरीतील नेहरूनगर येथे सुमारे २१६ कुत्र्यांच्या क्षमतेचे केंद्र आहे. तेथे प्रामुख्याने निर्बीजीकरण आणि लसीकरण केले जाते; मोठ्या संख्येने कुत्र्यांना कायमस्वरूपी ठेवणे तेथे शक्य नसल्याने स्वतंत्र निवारा केंद्रांची गरज असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.
न्यायालयाच्या निर्देशांनुसार निर्बीजीकरण, लसीकरण आणि आवश्यक तेथे कुत्र्यांना निवारा केंद्रात ठेवण्याची व्यवस्था केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.










