भोसरीतील गवळीमाथा परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका ३८ वर्षीय मजुराच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सुमारे ४० वर्षीय एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबरच्या रात्री ११ ते १२ च्या दरम्यान कचरा डेपोसमोरील भंगार दुकानाजवळ फिर्यादी आणि संशयित दोघे गप्पा मारत बसले होते. त्या वेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे भांडणात रूपांतर झाले.

रागाच्या भरात संशयिताने जवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खडसे पुढील तपास करीत आहेत.