देशी तंत्रज्ञानाने बॅटरी सेल विकसित करणारे केंद्र आता चिखलीत उभे राहणार आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चिखलीतील रिसर्च पार्कमध्ये हे केंद्र होणार असून त्यासाठी विद्यापीठाने जेएसडब्ल्यू समूहाच्या जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. बॅटरीचे नमुने तयार करणे आणि ते छोट्या प्रमाणावर तपासणे असे काम करणारे हे देशातील पहिलेच केंद्र ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.
प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार असून एकूण गुंतवणूक ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. सुरुवातीला संशोधन केंद्र उभारले जाईल. तेथे लिथियम-आयन, सोडियम-आयन आणि इतर नव्या रसायनांपासून बनणाऱ्या सेलचे डिझाइन, संगणकीय प्रारूप (सिम्युलेशन) आणि नमुने तयार होतील. पुढच्या टप्प्यात तयार सेलची गुणवत्ता तपासून त्यांना मान्यता देणारे केंद्र सुरू होईल.
करारावर जेएसडब्ल्यू समूहाच्या वतीने कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवाणी, तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे यांनी सह्या केल्या. कुलगुरू डॉ. सुनील भिरुड आणि विद्यापीठातील इतर अधिकारी या वेळी हजर होते.
बॅटरीशी संबंधित उद्योगात या केंद्रामुळे हजाराहून अधिक नोकऱ्या तयार होतील, असा अंदाज आहे. विजेवर चालणारी वाहने, वीज साठवणूक यंत्रणा आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल. भारतातील उष्ण हवामानात टिकणारे सेल देशातच डिझाइन करून तपासता येतील, त्यामुळे ही भागीदारी महत्त्वाची आहे, असे जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी नमूद केले.
नव्या बॅटरी तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष काम करण्याची संधी यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार असून संशोधनालाही चालना मिळेल, असे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड म्हणाले.









