पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचना २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज ६ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील, ७ ऑक्टोबरला छाननी होईल आणि ९ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. संपूर्ण प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, नव्या घोषणा आणि प्रसिद्धीबाबत निवडणूक नियमांचे पालन करावे लागेल. नव्या विकासकामांच्या घोषणा, उद्घाटने, भूमिपूजने आणि लोकप्रतिनिधींच्या प्रचारात्मक उपक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी आवश्यक असलेले नियमित, अत्यावश्यक आणि सुरू असलेले प्रशासकीय कामकाज मात्र नियमानुसार सुरू राहणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती आणि प्रचाराच्या तयारीला वेग येणार आहे.










