आप युवा आघाडीचे रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. उद्यान विभागातील अधिकारी महेश गारगोटे यांना ‘पैशांचे झाड’ भेट देत आंदोलकांनी या वृक्षतोडीचा निषेध नोंदवला.
झाडे तोडण्याची परवानगी मिळवताना झाडांची संख्या आणि त्यांचे वय याबाबत कागदपत्रांत फेरफार करण्यात आला आणि वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल झाली, असा आरोप पक्षाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
संबंधित बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या ना-हरकत दाखल्याचीही चौकशी करावी आणि बेकायदा वृक्षतोडीला जबाबदार असणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
५२ झाडांची तोड ही पर्यावरणाचे मोठे नुकसान असून तातडीने चौकशी व निलंबनाची कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काळे यांनी दिला. या वेळी पर्यावरणप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. या आरोपांवर महापालिकेची बाजू अद्याप समोर आलेली नाही.









