चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळ यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. दोन्ही मंडळांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. याबाबत मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे चालक-मालकांना आधीच लेखी सूचना देण्यात आल्या होत्या.
नियमभंग आढळल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत आठ डीजे स्पीकर, दोन मिक्सर, दोन अॅम्प्लिफायर आणि एक वाहन जप्त करण्यात आले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.










