पोलिसांच्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी तीन-चार महिला आणि तीन पुरुष इनोव्हा कारमधून वाकडमधील स्टार बाजारमध्ये आले. त्यांनी तूप, बदाम, काजू आणि इतर खाद्यवस्तू असा सुमारे ४२ हजार १०० रुपयांचा माल लंपास केला. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपास पथकाने दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून चोरीसाठी वापरलेली कार मुंबईच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वाहनाचा माग काढत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले.
चौकशीत वाकडसह पिंपरी आणि चिखलीतील स्टार बाजार, तसेच पुण्यातील केसनंद फाटा आणि वाघोली येथील दुकानांमधूनही काजू, बदाम आणि तुपाची चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरोधात पिंपरी आणि चिखली पोलिस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत.
मुंबई आणि राज्याच्या इतर भागांतही या टोळीने असे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.












