गुंतवणूक, संचालकपद आणि परताव्याचे आश्वासन देऊन सुमारे ११.६७ कोटी रुपये घेऊन ते परत न केल्याच्या आरोपावरून वाकड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका खासगी खाद्य कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतले आहे. वडगाव न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात हा संशयित सुमारे दोन महिन्यांपासून तिहार कारागृहात होता. आर्थिक गुन्हे शाखेने २६ सप्टेंबरला त्याला तिहार कारागृहातून ताब्यात घेऊन पुण्यात आणले.

वाकडमधील गुन्हा महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (वित्तीय आस्थापना) अधिनियम, १९९९ (एमपीआयडी) अंतर्गत दाखल आहे. फिर्यादीनुसार, गुंतवणूक आणि कंपनीतील भागीदारीबाबत दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादीने मोठी रक्कम दिली; मात्र ती ठरल्याप्रमाणे परत मिळाली नाही. ही रक्कम विविध कंपन्या आणि बँक खात्यांमधून फिरवण्यात आल्याचा तपशीलही फिर्यादीत आहे.

याच कंपनीची संचालक असलेली सहआरोपी अद्याप फरार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी सांगितले. नाशिक, मुंबई आणि दिल्लीतही या दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अशाच प्रकारे आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून व्यवहारांचा आणि दोन्ही आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत.