दानवे यांच्या दौऱ्याची सुरुवात दापोडी येथील शिवसेनेच्या विभागीय कार्यालयापासून झाली. या वेळी शहराध्यक्ष चेतन पवार यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी पिंपरीतील एका गणेश मंडळाला आणि रहाटणीतील संघर्ष तरुण मित्र मंडळाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहरप्रमुख चेतन पवार यांच्या निवासस्थानीही ते गेले. दिवसभरात विविध शाखा आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या.
या वेळी बोलताना दानवे यांनी राज्यातील अनेक भागांतील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून सरकारने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळापासून मुक्ती मिळावी आणि सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली.
दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी झालेल्या भेटींमुळे पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.










