मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) नावाखाली लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रविवारी (२७ सप्टेंबर) पिंपरीत आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. निवडणूक आयोगाचे निर्णय बहुमताने किंवा सर्वसंमतीने होणे अपेक्षित असताना काही निर्णय परस्पर घेतले गेले, असा आरोप पवार यांनी केला. मतदार यादीचे सॉफ्टवेअर केंद्रीकृत करून राज्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी मतदार याद्यांचे पुनरीक्षण एसएसआर (स्पेशल समरी रिव्हिजन) पद्धतीने होत असे. ती पद्धत बाजूला ठेवून सुरू केलेली एसआयआर प्रक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती तातडीने रद्द करावी, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
एसआयआरविरोधातील आंदोलन आता मुंबईत नेण्यात येणार असून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इतर राजकीय पक्षांनीही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या वेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









