कर आकारणी व कर संकलन विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी कर वसुली, थकबाकी, नव्या मालमत्तांची कर आकारणी आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. मोठ्या प्रमाणात कर थकवणाऱ्या मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीची कारवाई सुरू करावी, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र वापराच्या तसेच इतर मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर प्राधान्याने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार आणि विभागातील अधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंत ५९२ कोटी ७४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाल्याचे महापालिकेने सांगितले.

ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करात ४ टक्के सवलत दिली जात असून त्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.